३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे करवी गांधी हत्या घडली . आज अनेक वर्षं त्या घटनेला उलटून गेली आहेत. देशांत या दोघांच्या समर्थकांचे दोन वेगवेगळे गट पडले आहेत. 

गांधी समर्थक नथुरामला देशद्रोही मानतात तर नथुराम समजू लागलेले लोक त्याला देशभक्त मानतात.

आज महात्मा गांधी आपल्यात नाहीत आणि नथुराम गोडसे देखील नाही. आणि या घटनेकडे तटस्थपणे बघता दोघांबद्दल मला काहीशी करुणा वाटते. कारण दोघांमध्ये वैयक्तिक वैमनस्य नसलं तरी देशाप्रती  वैचारिक युध्द जरूर होतं. आणि त्याचीच परिणीती दोघांच्याही मृत्यूत झाली. 

काही गोष्टी खरोखर अनाकलनीय असतात. 

‘अहिंसा परमो धर्माः ’ या तत्वाचे  आयुष्यभर आचरण करणाऱ्या गांधींचा मृत्यू हा हिंसेने व्हावा आणि त्यांना ठार मारणारा नथुराम गोडसे याचा मृत्यू फाशीच्या स्तंभावरच व्हावा हे विधिलिखित होतं. 

नथुराम गोडसे, त्याचे विचार व सिद्धांताचे समर्थन करणारी अनेक माणसं आहेत. परंतू, त्याने केलेल्या हत्येच्या कृतीचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. किंबहुना ते अयोग्य ठरेल. 

त्याच बरोबर, महात्मा गांधी हे ‘महात्मा’ होते म्हणून ते करीत असलेली कोणतीही कृती योग्यच आहे हे ही म्हणणे तितकेच अयोग्य आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे, त्यांचे विचारांचे समर्थन नं करणारी व्यक्ती देशभक्त नाही हेही चुकीचेच.

आजच्या तारखेला, गांधी हत्या होऊन ७३ वर्ष उलटून जात आहेत. गांधींना चूक अथवा बरोबर ठरवून घडून गेलेल्या घटना बदलता येणारं नाहीत. फक्त इतिहास म्हणून त्याकडे बघावं असं वाटलं आणि त्याबद्दल मिळवलेल्या माहितीवरून जे काही आकलन झालं ते मांडत आहे.

गांधी हत्या कट :

भारताचे स्वातंत्र्य हा अनेक क्रांतिकारक आणि देशभक्तांसाठी जिव्हाळ्याचा विषय. परंतू, अखंड भारताची मागणी करणार्यांपैकी नथुराम गोडसे एक. या उलट भारत-पाकिस्तान असे भारताचे दोन तुकडे होण्यात सर्वात मोठा हात गांधींचा होता अशी समजूत अनेक देशवासीयांची झाली होती.. 

गांधी हत्या होण्यासाठी पडलेली पहिली ठिणगी हीच. 

गांधी हे हिंदू-विरोधी व मुस्लीम धार्जिणे होते हे त्यांच्या अनेक कृतींतून दिसून येत होतं. देशात घडणाऱ्या हिंदू -मुस्लीम दंगलींना सर्वतोपरी गांधी जवाबदार आहेत, हे नथुरामचं ठाम मत झालं होतं. 

स्वातंत्र्यानंतर चालवत असलेल्या सरकारने गांधी-नेतृत्वाखाली केलेल्या अनेक चुका या देशाला पुढे भोगाव्या लागणार आहेत ही व्यथा त्या काळात अनेकांना वाटत असे. नथुराम त्यातलाच एक.

मुसलमानांना हिंदू करून मूळ प्रवाहात मिळवण्याऐवजी आपल्या ‘धर्मनिरपेक्ष’ वा ‘सिक्युलर’ सरकारने त्यांच्या अलगतेला जास्त प्रोत्साहन दिले. नव्या मशिदी उभ्या करवल्या.

मुस्लीम जनसंख्या प्रमाणापेक्षा वाढवण्याची मुभा ठेवली. ‘धर्मा’च्या नावाखाली अनेक लग्न करण्याची मुक्तता ठेवली. आणि ‘एक संविधान एक विधी’ या सुत्राचीच खुद्द सरकारने विटंबना केली. 

(याचे पडसाद अगदी अजूनही देशात उमटताना दिसतात. सध्या श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी नुकत्याच झालेल्या मुलाखतीत म्हटले की “मुसलमान कुणाचं ऐकत नाहीत. गांधी पण सांगून थकले. आता हिदूंनी देखील चार मुलांना जन्म द्यावा अशी वेळ आली आहे”. आज ज्या पटीने मुस्लीम लोकसंख्या वाढत आहे, आणि हिंदू काहींना एक/ काहींचे विवाह नाही/ काहींना मुलं नाहीत, त्या हिशोबाने पुढील काही वर्षांत भारतात हिंदू अल्पसंख्याक बनतील. असो हा विषय वेगळा असला तरी  याची सुरुवात गांधींनी दिलेल्या मोकळीकी मध्ये आहे.)

पण राष्ट्रिय एकत्मेतेचे जल्लोष मात्र हिंदूंच्या कानावर आदळले. निष्ठेने व तळमळीने देशसेवेत कार्यरत  असलेले हिंदू सिक्युलर लोकांकडून उपहासाचे/तिरस्काराचे लक्ष्य होत आले. 

या सर्व घटनाक्रमांचा परिणाम खोलवर समाजमनावर होत होता. आणि त्याचा उच्चांक म्हणजे ‘५५ कोटी पाकिस्तानला त्वरित  देण्यात यावे यासाठी सरकारवर दबाव आणावा म्हणून गांधीनी उपोषण जाहीर केलं’, त्यावेळी झाला. 

५५ कोटींची गोष्ट :

भारत – पाक वेगळे झाल्यानंतर ७५ कोटी भारताने पाकिस्तानला देण्यात यावे हा ठराव झाला होता. त्यापैकी २० कोटी देऊन झाले होते.

परंतू, पाकिस्तान कडून काश्मीर मध्ये घुसखोरी, तिथली जमीन बळकावण्याचा प्रयत्न, सीमेवर हल्ले अश्या अप्रिय घटना घडल्याने  आणि देशात असंतोष असल्याने, ५५ कोटी पाकिस्तान ला देऊ नये असे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे ठाम मत होते. आणि पंतप्रधान नेहरू देखील त्यास दुजोरा देत होते.

काश्मीर प्रश्न सुटेपर्यंत तरी ५५ कोटी रोखून ठेवावे जेणेकरून पाकिस्तान ला त्यांच्या कुकर्मापासून रोखता येईल असे पटेल यांचे मत होते. 

राजकीय क्षेत्रातील काही मंडळीना गांधीनी आता राजकारणात ढवळाढवळ करू नये असेही वाटत होते. आणि तिकडे गांधी ‘हे सरकार पाकिस्तानला दिलेले आपले वचन काही पूर्ण करीत नाहीत’ या विचाराने उपोषणाला बसले. 

आणि मग शेवटी त्यांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून वल्लभभाई पटेल ते ५५ कोटी पाकिस्तानला देण्यास तयार झाले.

यामुळेच, गांधींचे राजकीय अस्तित्व आपल्या देशाला नेमक्या कोणत्या दिशेने नेत आहे आणि पुढे नेईल या विचाराने नथुराम अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्यातूनच गांधी हत्या करावी हा विचार त्याच्या मनांत आला असावा असा अंदाज नथुरामचे  भाऊ गोपाळ गोडसे यांनी ‘गांधी हत्या आणि मी ’ या आपल्या पुस्तकात वर्तवला आहे.

खरं पाहता, आपण दिलेलं वचन पाळलं पाहिजे हे गांधींचं म्हणणं अगदीच चुकीचं नव्हतं. परंतू,  आपली तत्व कितीही योग्य असली तरी समोरचा देखील त्या तत्वांचा किंवा त्यांचा आदर करणारा हवा.

अशा विषम परिस्थितीत काही वेळा आपली तत्व बाजूला ठेवून निर्णय घ्यावे लागतात हे गांधींना पटत नव्हतं. आणि पाकिस्तान आपल्या विरुद्ध उभा राहूनही आपण आपली वचनं पाळायचा हट्ट अनेकांना व्यवहार-विसंगत वाटू लागला.

हीच ती वैचारिक दरी ज्यामुळे नथुराम काहीतरी भयंकर करण्यास प्रवृत्त झाला आणि भारताच्या इतिहासात गांधी हत्या हा अध्याय समाविष्ट झाला.. 

गांधी हत्येचा पहिला प्रयत्न  :

महात्मा गांधी यांच्यावर पहिला प्राणघातक हल्ला झाला २० जानेवारी १९४८ रोजी. नेहमी प्रमाणे गांधीजी प्रार्थना सभेत असताना चालू सभेत कोणीतरी बॉम्ब फेकला.

हा बॉम्ब सभेच्या ठिकाणच्या समोरच्या भिंतीला लागल्याने ती भिंत कोसळली. स्फोटानंतर काही प्रमाणात लोकांमध्ये पळापळ झाली. सभेत स्फोट घडवून माणसांच्या चेंगराचेंगरी दरम्यान गांधीजींची हत्या करण्याचा बेत आखला गेला होता, पण तो प्रयत्न फसला.

हा बॉंब ज्याने टाकला त्याचं नाव होतं “मदनलाल पाहावा”. मदनलाल हा मूळच्या पाकिस्तान भागातला. फाळणीनंतर आपला जीव वाचवून तो भारतात आला होता. 

या दरम्यान त्याने निर्वासितांची जी परिस्थिती बघितली त्यातून त्याच्या मनात राग धुमसत होता. तो ग्वाल्हेरमार्गे मुंबईत आला. मुंबईत त्याला जगदीशचंद्र जैन या हिंदीच्या प्राध्यापकांनी आश्रय दिला होता. 

जगदीशचंद्र जैन यांच्याकडे त्याने आपली कहाणी मांडली. याच ओघात त्याने आपल्या सूड घेण्याच्या भावनेबद्दल बोलून दाखवलं. जगदीशचंद्रांनी त्याला समजावण्याचा व रोखण्याचा प्रयत्न केला, पण तोवर मदनलाल पाहावा सुडाच्या भावनेने पुरता पेटला होता.

पुढे हाच मदनलाल २० जानेवारी रोजी बॉम्ब टाकून पळत असताना एका स्त्रीने त्याला पाहिलं आणि तो लगेच पकडला गेला. यावेळी पुढच्या हत्येच्या बेतात असलेले नथुराम, आपटे हे त्याचे साथीदार तिथून पळून गेले.

मदनलाल पाहावा पकडला गेल्यानंतर तो पोलिसांसमोर सगळं काही बोलून मोकळा झाला. त्याने आपण गांधीजींच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या ७ जणांपैकी एक आहोत हे पोलिसांना सांगितलं.

त्याचे हे साथीदार मरीना हॉटेलमध्ये थांबले असल्याचंदेखील त्याने सांगितलं होतं. पोलिसांनी या हॉटेलवर धाड घालण्याआधी मारेकरी पळून गेले होते.

मदनलालने यावेळी नथुराम गोडसे हे नाव घेतलं नसलं तरी त्याचा उल्लेख ‘अग्रणी’ या वृत्तपत्राचा संपादक म्हणून केला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांना नथुराम गोडसेपर्यंत पोहोचणं सहज सोप्पं होतं.

नथुराम आणि नारायण आपटे

मदनलाल पाहावाने ५४ पानी कबुलीजबाब नोंदवला. यात ठळक अक्षरात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांची नावे होती. मदनलालच्या जबानीवरून मिळालेले धागेदोरे हाती लागूनही दिल्ली पोलिसांनी चौकशी करताना ढिलाई दाखवली.

मदनलालच्या सुडाबद्दल ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं ते जगदीशचंद्र जैन यांनी ‘कपूर आयोगासमोर’ दिलेल्या जबानीत सांगितलंय की गांधी हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती आपण जयप्रकाश नारायण, अशोक मेहता तसेच बाळासाहेब खेर यांना दिली होती, पण कोणीही ते मनावर घेतलं नाही.

मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांनी मिळालेली माहिती मोरारजी देसाईंमार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत पोहोचवली. यानंतर ही बातमी खुद्द गांधीजींपर्यंत पोहोचली.

आपली हत्या होणार, २० तारखेला झालेला हल्ला हा त्याचीच रंगीत तालीम होती हे गांधीजींना कळून चुकलं होतं. या हत्येबाबत वल्लभभाई पटेलांना समजल्यानंतर त्यांनी प्रार्थना सभेत सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला.

पण गांधीजींनी त्याला विरोध केला. आपल्याला कोणतीही सुरक्षा नको म्हणून त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर सभेला येणाऱ्यांची झडती घेण्याचंही त्यांनी अमान्य केलं.

तरीही गांधीजींना न सांगता स्फोटानंतर प्रार्थना सभेतली पोलिसांची संख्या ५ वरून ३६ करण्यात आली होती. या पोलिसांना साध्या वेशात उभं करण्यात आलं होतं. पण गांधीजींनी झडती न घेण्याबद्दल सांगितल्यामुळे नथुराम रिव्हॉल्वर घेऊन सभेत शिरण्यात यशस्वी झाला.

गांधी हत्येचा दिवस :

३० जानेवारी रोजी वल्लभभाई गांधीजींना भेटायला आले. गांधीजींनी जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यातील मतभेद जाणून पुढे दोघांनी सलोख्याने एकत्र काम करत राहावे असे त्यांना समजावले. 

त्यावेळी संध्याकाळचे ४ वाजले होते. त्यांची सभा ५ वाजता सुरु होणार होती. गांधीजी हे वेळेचे काटेकोर असूनही ते पटेलांशी चाललेल्या चर्चेमुळे त्यादिवशी ५ मिनिट उशिराने प्रार्थना सभेत पोहोचले.

गांधीहत्या

गांधीजी ठीक ५ वाजून ५ मिनिटांनी सभेत हजर झाले. लोकांच्या प्रणामाचा स्वीकार करत असताना जमावात असलेला नथुराम लगेच समोर आला. त्याने गांधीजींना आधी प्रणाम केला मग सलग ३ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

गांधी हत्या आणि सावरकर / गांधी हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ :

मुळात या तिन्ही भिन्न गोष्टी आहेत. तरीही, गांधी हत्या झाली त्यात सावरकरांचा हात होता किंवा आर एस् एस् ने मोठा कट रचला असे आरोप अजूनही होतांना दिसतात. 

याला कारण म्हणजे नथुराम हा एकनिष्ठ संघाचा कार्यकर्ता होता. आणि दुसरं असं की सावरकरांच्या लिखाणाचा, भाषणांचा त्याच्यावर प्रभाव होता. अनकेदा तो सावरकराना भेटत असे. लेखन करतांना संदर्भ ग्रंथ कसे वापरावे, इत्यादी गोष्टी तो सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली शिकला होता.

परंतू या सगळ्याचा, गांधी हत्येशी संबंध लावणं अत्यंत चुकीचं आहे कारण, स्वा. सावरकरांची यातून निर्दोष सुटका झाली. कोणतेही पुरावे त्यांच्या विरुद्ध मिळाले नाहीत. 

सावरकर निर्दोष

त्याच प्रमाणे संघ देखील गांधी हत्येत सामील नव्हता. 

स्वा. सावरकर आणि गांधी या दोहोंचे विचार म्हणजे एक पूर्व तर एक पश्चिम अशी अवस्था होती.

‘शांततेच्या मार्गाने त्यांना जायला सांगू’ म्हणणारे गांधी, तर ‘अरे, आपल्याच घरात घुसलेल्याला विनंत्या आणि प्रार्थना कसल्या करताय? त्याला हाकलून लावलं पाहिजे ’ अश्या विचारांचे स्वा. सावरकर.

देश विभाजनाला तयार असणारे गांधी तर ‘स्वातंत्र्य हवं तर अखंड भारतच हवा ’ असा हट्ट सावरकरांचा.

याचे उदाहरणार्थ स्वा. सावरकरांच्या २ ऑगस्ट १९४२ ला शनिवार वाड्यापुढे झालेल्या भाषणाचा एक अंश देत आहे, 

“गांधींच्या नेतृत्वाखाली ‘क्विट इंडिया ’ अशी आरोळी ठोकून काँग्रेस ने सुरु केलेला स्वातंत्र्य संग्राम जर खऱ्याखुऱ्या आणि निर्भेळ राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी असेल तर हिंदुसभा ही त्या संग्रामात सहकार्य करण्यास सिद्ध आहे.

प्रतीसहकाराच्या धोरणानुसार हिंदू महासभेचा आग्रह आहे की, ज्या स्वातंत्र्यासाठी ही झुंज आहे,ते अखंड हिंदुस्तानचे आहे आहे कॉंग्रेसने ठामपणे ठरावात नमूद केले पाहिजे.ही गोष्ट कॉंग्रेसला मान्य नसेल तर छिन्नभिन्न मातृभूमीच्या स्वातंत्र्य संग्रामात हिंदू महासभा सहभागी होणार नाही.”

ह्या त्यांच्या भाषणांचा आणि विचारांचा अनेकांवर प्रभाव होता. परंतू, गांधीच्या विचारसरणी विरुद्ध आहेत म्हणून त्यांना गांधी हत्येत गोवणे बिनबुडाचे आहे. 

नथुराम गोडसे ने गांधी हत्या केली, हे कृत्य असमर्थनीय असले तरी त्याच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणे चुकीचे आहे.

अहिंसा योग्य आहे. जगभरातील लोक आज गांधींच्या विचारांचा अभ्यास करत आहेत जागतिक शांततेचा मुद्दा विचारांत घेण्यासाठी. 

पण त्याच बरोबर युद्ध शास्त्रात देखील तितकीच प्रगती करत आहेत. यातून काय बोध घ्यावा?

शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात म्हटलं होतं, की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, भारत भेटीत ‘मी गांधी विचारांचा पुरस्कर्ता आहे ’ असं म्हणून काँग्रेस मंडळींना खूष करतात. परंतू, पाकिस्तानात घुसून ओसामाला मारतात आणि प्रत्यक्षात सावरकरच अंमलात आणतात.

खरं आहे नं?

कारण प्रत्येक राष्ट्राला हे ठाऊक आहे की सीमेच्या रेषा या चरख्याच्या सुताने नाही तर तलवारीच्या पातीने आखायच्या असतात. 

गांधींनी केलेलं काम मोठं आहे यात अजिबात शंका नाही. परंतू, त्यांच्या हातून काही चुका देखील झाल्या हे साळसूदपणे झाकल्या जातं. 

नथुराम कोर्टात

नथुराम गोडसेने आयुष्यात एकच खून केला. त्याचं कृत्य एखाद्या माथेफिरूचं नव्हतं. शांतपणे  आणि पुढील परिणामांचा विचार करून केलेलं होतं.

त्यामुळे, कोर्टात देखील गांधी हत्या केल्याचा आरोप त्याने  ताबडतोब  मान्य केला आणि फाशी जाण्यास तयार झाला. त्यासाठी कोणताही दयेचा अर्ज त्याने केला नाही. 

त्याला आणि नारायण आपटेला एकाच दिवशी फाशी देण्यात आली. 

खरंतर, मनुष्य जन्मताच त्याचे भविष्य त्याच्या कपाळावर लिहिले असते. ते वाचण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नसते. नाहीतर ‘विधिलिखित ’ या संज्ञेला काही अर्थ राहिला नसता.

प्रत्येकाचा मृत्यू विधात्याने निश्चित केला आहे.

मृत्यू तर अटळ आहेच पण त्याचा काळ आणि मार्ग मात्र अज्ञात !

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !Source link