मोदी सरकारनी आतापर्यंत घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण व उत्तमोत्तम निर्णयांपैकी सर्वोच्च कोणता निवडायचा झाला, तर तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मतिथी ‘’पराक्रम दिवस’ या नावाने या साजरी करण्याचा. 

आणि आज २३ जानेवारी, नेताजींची १२५ वी जयंती, अर्थात ‘पराक्रम दिवस’.

भारतीय सैन्य दिवसप्रमाणे आजचा ही दिवस साजरा करण्याचा…

देशाचं ‘स्वातंत्र्य ’ या एका वेडापायी या माणसाने किती आणि काय काय पराक्रम केले याची काही गणती असावी की नाही ?

त्यामुळे नेताजींच्या जयंतीला ‘पराक्रम दिवस ’ याहून वेगळं नाव असूच शकत नाही. नाही का?

म्हणजे कधीकधी वाटतं, की आपली भारतमाता सुद्धा बंदिवान असतांना, सुभाष संध्याकाळी दमूनभागून घरी आल्यावर , “काय रे बाबा, आज कोणता पराक्रम करून आलास?? मला या गोऱ्यांच्या तावडीतून सोडवायला?” असं विचारत असावी.

आणि सुभाषबाबू पण , “काही नाही ग आई, जरा शेजारी हिटलर ला भेटून आलो. घरात चोर घुसलेत तर म्हटलं शेजारी पाजारी काही मदत करतात का बघू.” असं काहीसं म्हणत असावेत का??

बरं  हा एक वेडा आणि दुसरा वेडा म्हणजे आपले सावरकर …

त्याने त्याच्या प्रतिभेने कविता लिहाव्यात, कारावास भोगावा, लोकांना प्रेरित करावं. 

आणि दोघांचा ध्यास एकच…. स्वातंत्र्य !

आणि या दोन प्रवाहांनी एका दुर्मिळ क्षणी एकत्र यावं आणि भारताचा इतिहासच बदलावा!

आजचा दिवस खरंतर नेताजींचा, पण मी सावरकरांचा देखील उल्लेख करते आहे कारण,

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे हेच  दोन खरे महानायक!

जितकी अनमोल त्यांची कामगिरी, देशावर निस्सीम प्रेम, त्यांचा त्याग, तितकीच किंबहुना त्याहून अधिक त्यांच्या पदरी पडली ती फक्त उपेक्षा !! 

खरंतर, बंगाली शैलीच्या गोल चेहर्‍याचे, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे, सुभाषबाबू ICS अधिकारी म्हणून निवडले गेले होते. परंतू ते सोडून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. 

आपल्या व्यक्तित्व, वक्तृत्व आणि कर्तृत्वानं त्यांनी सामान्य जनमानसात अढळ स्थान मिळवलं. नेताजींची लोकप्रियता प्रचंड होती. 

त्याच बळावर, साक्षात गांधीजींचा विरोध असून, गांधीजींनी देशभर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी त्यांचे उमेदवार सीतारामैय्या यांचा सक्रिय प्रचार करून सुद्धा, सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले होते. देशभरातल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यांच्या पाठिंब्यानं. हे विशेष नाही का?

आणि तरीसुद्धा. 

तरीसुद्धा, त्यांना तत्कालीन पदावरून कारभार करणं इतर काँग्रेस सदस्यांनी अशक्य करून सोडलं. त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि त्यामुळे ते काँग्रेस मधून बाहेर पडले.

देश त्यावेळी दोन विचारसरणी मध्ये विभागला गेला होता. गांधीजींचे अनुयायी, ज्यांना इंग्रज ‘अहिंसेने ’ , उपोषणाने सहज निघून जातील अशी खात्री होती.

तर सावरकर सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही पातळ्यांवर स्पष्टपणे अहिंसा नाकारत होते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ अशी भूमिका घेऊन सावरकरांनी सशस्त्र क्रांती शिवाय पर्याय नाही हेच पुन्हा पुन्हा दर्शवले.

कारण, अहिंसा परमो धर्म असता, तर शिवाजी महाराज देखील अफजल खानाला भेटायला जाताना चिलखत व वाघनखं न घालता  गेले असते आणि तो त्यांचा शेवटचा दिवस ठरला असता, यास इतिहास साक्षी आहे. 

श्रीरामाच्या हातात धनुष्य तर श्रीकृष्णाच्या हाती सुदर्शन आहेच. त्यामुळे, शत्रूला बाहेर काढायचे तर रक्त सांडावेच लागणार हे सावरकरांचं म्हणणं. परंतू, अगदी उघडपणे व स्पष्टपणे ते हिंदुत्ववादी विचार मांडत त्यामुळे काँग्रेसचे उदारमतवादी त्यांना कडकडून विरोध करत.

१८५७ पासून गोऱ्यांना हाकलण्यासाठी अनेकांनी आपलं रक्त सांडल होतं. अनेक क्रांतिकारक फाशी गेले होते. अनेक बंदिवानांना कारागृहात अतिशय अमानुष छळ सहन करावा लागत होता. आणि एवढं होऊनही केवळ चर्चेने इंग्रज जातील हे सावरकर किंवा नेताजींना पटत नव्हतं.

इकडे नेताजींची सुद्धा काही नं काही  धडपड सुरूच होती. अधूनमधून कारावास देखील भोगावा लागत होता.

नेताजी सावरकर भेट

आणि मग एक ऐतिहासिक भेट घडली, या दोघांची. नेताजी, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला गेले होते.

आणि त्यांच्या गुप्त व महत्वपूर्ण चर्चे मध्ये, सावरकरांनी, नेताजींना अतिशय विचारपूर्वक काही सूचना केल्या व प्रेरणा दिली.

 

त्यापूर्वी सुभाषबाबूंनी – कलकत्त्यातला ब्रिटिश अधिकारी हालवेल – याचा पुतळा हटवावा अशी मागणी करून आपण त्यासाठी आंदोलन हाती घेणार आहोत असं जाहीर केलं होतं.

परंतू, सावरकरांनी सुचवलं की अशा दुय्यम विषयात गुंतून, त्या नादात तुरुंगात न जाता सुभाषबाबूंनी देशाबाहेर निसटावं, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्यानं जर्मनी, जपानशी संधान बांधावं’.

सावरकर जपानमधील  रासबिहारी बोस यांच्याशी संपर्कात होते. रासबिहारी बोसनी ब्रिटिश सैन्यातून लढलेल्या, पण जर्मनीच्या कैदेत असलेल्या भारतीय सैनिकांना हाताशी धरून आपली एक सेना बनवली होती. हीच ती आझाद हिंद सेना !

सावरकर दुसर्‍या महायुद्धात भारतीय तरुणांनी सैन्यात भरती व्हावं असं सांगत होते. याला तत्कालीन काँग्रेसचे नेते ‘देशद्रोह’ म्हणत होते. 

सावरकरांचं सांगणं होतं की, देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळणारच आहे. अशावेळी देशाला अनुभवी आणि युद्धशास्त्रात तज्ञ असलेलं सैन्य पाहिजे, म्हणून तरुणांनी आत्तापासून सैन्यात भरती व्हावं.

शिवाय ब्रिटिशांकडून लढताना जे भारतीय सैनिक जर्मनी किंवा जपानच्या कैदेत पडलेले ते आझाद हिंद सेनेत दाखल होऊन स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढू शकतील, अशी सावरकरांची धारणा होती.

त्यानुसार सावरकरांनी सुभाषबाबूंना सूचना केली होती. आणि रासबिहारी बोस यांचं पत्रही सुभाषबाबूंना दाखवलं होतं.

नेताजी हिटलर भेट

यामुळे प्रभावित होऊन, पुढे नेताजी जर्मनीला जाऊन हिटलरला भेटले. अगदी जगभरातील देशांची मदत घेऊन आपल्या देशात घुसलेल्या त्या इंग्रजांना हाकलून लावावं अशी त्याची इच्छा होती. त्यांनी अनेक भारतीयांना आझाद हिंद सेनेत भरती होण्याचे आवाहन केले.

गांधीजींच्या नेतृत्वाखाली, रस्त्यावर उतरून संचलन, उपोषण, सरकारशी वाटाघाटी सुरु होत्याच. परंतु, सावरकर व नेताजींच्या ‘सशस्त्र लढ्याची ’ देखील तयारी सुरु होती.

आणि त्यामुळे , गांधीवादी काँग्रेस चा या सैन्य भरतीस तीव्र विरोध होता. शांततेच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळवायचं यावर काँग्रेस ठाम होती.

रंगून मधील ‘जुबली हॉल’ मध्ये, सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं ,

‘स्वतंत्रता संग्राम के मेरे साथियों! स्वतंत्रता बलिदान चाहती है। आपने आज़ादी के लिए बहुत त्याग किया है, किन्तु अभी प्राणों की आहुति देना शेष है। आजादी को आज अपने शीश फूल की तरह चढ़ा देने वाले पुजारियों की आवश्यकता है। ऐसे नौजवानों की आवश्यकता है, जो अपना सिर काट कर स्वाधीनता की देवी को भेंट चढ़ा सकें। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा। खून भी एक-दो बूंद नहीं बल्कि इतना कि खून का एक महासागर तैयार हो जाये और उसमें में ब्रिटिश साम्राज्य को डुबो दूं।’

azad-hind-fauj

आणि या भावपूर्ण आवाहनामुळे, अनेकांनी या सेनेत प्रवेश घेतला. 

सुभाषबाबूंनी 25 जून 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरून बोलताना सावरकरांचा आदरपूर्वक उल्लेख करत आभार मानले होते. सैनिक भरतीला काँग्रेसचे नेते कट्टर विरोध करत असताना सावरकरांनी सैनिक भरतीला प्रोत्साहन दिलं असं सुभाषबाबू म्हणाले.

कुठे अहिंसा आणि कुठे ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’ ही मागणी?? 

एक एक भारतीय जसजसा सेनेत भरती होऊ लागला, तसतसं ब्रिटीश काय अगदी आपल्याच देशात काँग्रेस ची देखील झोप उडाली होती. त्यांची लोकप्रियता पाहून काँग्रेसी त्यांचा द्वेष करीत. 

परंतू, १९४५ मध्येच नेताजीच्या विमानाला अपघात झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कित्येक दिवस कुणी हे मान्य करायलाच तयार नव्हते, की  त्यांचं निधन झालं असावं.

आझाद हिंद सेनेतील पहिली गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नीरा आर्या, हिला तर अंदमानात बंदिवान केल्या गेले. अनेक यातना देऊनही नेताजी कुठे आहेत हे ती सांगू शकली नाही. कारण त्यांना तर मृत घोषित केले होते. जेलरच्या अतिशय विकृत वागण्यामुळे नीरा तेथील अधिकाऱ्यावर थुंकली असता, तिच्या स्तनांना कापण्याची शिक्षा जेलर ने अधिकाऱ्याला सुनावली. 

नीरा आर्या

त्याने रागाने खरोखर कापायचा प्रयत्न केला परंतू त्या शस्त्राला धार नव्हती. तेव्हा तिचे केस खेचून विचारणा करण्यात आली. परंतु नेताजी कुठे आहेत हे मला माहीत नाही. या पलीकडे ती काहीही बोलू शकली नाही.

यावरही त्या जेलर ने ‘राणी व्हिक्टोरिया यांचे आभार मान की तिने शस्त्र तापवायला सांगितलं नाही. अन्यथा, तुझे दोन्ही स्तन आता काळेनिळे पडले असते. ’ 

हा हृदय द्रावक प्रसंग वाचल्यापासून, ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बीना ढाल ’ हे गाणं लागलं की मी निमूटपणे ते जाऊन बंद करते. 

एखाद्या माणसाला मोठं करायच्या नादात, इतरांना किती तुच्छ करता, या स्वार्थाला देखील काही प्रमाण असावं.

नेताजी गेल्याने, नंतर मिळालेल्या  स्वातंत्र्याचं पूर्ण श्रेय गांधीजींना दिलं गेलं. आणि नव्या स्वतंत्र देशाचे सर्वच राजकिय निर्णय हे नेहरू आणि गांधीजी यांनी घेतले. (त्याबद्दल पुन्हा कधीतरी…)

परंतू वाईट या गोष्टीचं वाटतं, की स्वातंत्र्यानंतर देखील, इतकी वर्ष  सावरकर यांच्या देशकार्यावरच सवाल निर्माण होतो …. नेताजींना म्हणावा तसा आदर अजूनही नाहीच…. किंबहुना इतिहातून त्यांना बाजूलाच करण्यात आलं अन्यथा, सत्य कळताच लोक त्यांचाच उदोउदो करतील. तेवढं होतंच त्यांचं कर्तुत्व थोर !

आणि नेताजी काय सावरकर काय यांचे अध्यायच इतिहासातून पुढील पिढीला शिकवले गेले नाहीत. त्यामुळे, अज्ञात क्रांतिकारकांचा विचार कोण करणार? नाही का?

ज्या नीरा आर्याचा मी या आधील परिच्छेदात उल्लेख केला आहे, ती तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी फुलं विकत होती. आणि असे कितीतरी होते, ज्यांच्या बलिदानाचा परीचय देखील  देशाला नाही.

परंतू, त्यांच्या त्या आझाद हिंद सेनेतील अस्तित्वाचा ब्रिटीशांच्या मनांत भय निर्माण करण्यात फार मोठा फायदा झाला.

कारण, किमान ५०० वर्षं तरी भारत सोडण्याचा विचार ब्रिटीशांच्या मनात नव्हता. परंतु, ज्या दिवशी भारतीयांच्या हातात शस्त्र येईल आणि ते आमच्याविरुद्ध एकत्र येतील, त्यानंतर एक दिवसही आम्हांस इथे थांबता येणार नाही असा त्यांचा विश्वास होता.

१९५६मध्ये.,जस्टिस पीवी चक्रवर्ती, जे पश्चिम बंगालचे पहिले राज्यपाल होते, त्यांनी, क्लीमेत  एटली यांना विचारलं होतं, की ब्रिटीश भारत सोडून का गेले होते?

तर त्यांनी एकच उतर दिलं होतं, “सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना ”

आता याहून मोलाचं आजच्या दिवशी लिहायला माझ्याकडे खरोखर  शब्द नाहीत.

अश्या थोर व पराक्रमी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानाचा मुजरा…

नेताजींच्या मृत्युनंतर तब्बल ७५ वर्षांनी आज, त्यांच्या जयंतीला वलय प्राप्त झालं आहे. हे ही नसे थोडके. 

मेरा देश सच मे बदल राहा है |

पराक्रम दिवसाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा …

जय हिंद !!Source link