सर्व भक्तांना भिकारदास मारुती जन्मोत्सवाच्या शुभेच्छा !

आजच्या पोस्ट ला असे शीर्षक का दिले असं वाटत असेल तर सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की, इतक्या विविध नावांनी भगवान हनुमानाला ओळखले जाते आणि एवढ्या विविध नावांची मंदिरे भारतात आणि विशेषतः पुण्यात आहेत, त्या पैकी ‘भिकारदास मारुती’ हे माझे अत्यंत लाडके नाव आहे. 

याचं कारण असं आहे, की जोपर्यंत एखाद्या गोष्टीमागचा गर्भितार्थ आपल्याला माहीत नसतो तोवर आपल्याला त्या गोष्टीचं महत्व कळत नाही. 

‘भिकारदास मारुती’ या नावाच्या बाबतीत देखील माझे असेच झाले होते. ही कसली दळभद्री नावं ठेवतात देवांना? अशी माझी भावना होती. 

पुण्यात तर जिलब्या मारुती, ढोल्या गणपती, पसोड्या विठ्ठल अशी एक से एक मंदिरं आहेत. आणि त्यांच्या नावामागची गंमत अशी की पेशव्यांच्या काळात पुण्यात एवढी मंदिरं अगदी अंतरा अंतरावर  स्थापन झाली की प्रत्येक मंदिराला केवळ गणपती मंदिर, विठ्ठल मंदिर नाव देणं अशक्य होतं. 

मग आजूबाजूच्या वास्तू नुसार अथवा बांधणाऱ्या व्यक्तीवरून अशी विविध नावं पडली. 

उदाहरणार्थ बटाट्या मारुती का? तर त्याच्या बाजूला कांदे-बटाट्याचा मोठा व्यापार चाले, बुधवार पेठेतील पसोड्या विठ्ठल का तर त्या पेठेत घोंगड्या पसोड्या यांचा व्यापार चाले.

तर अशी त्या नावामागची कथा.

त्यातलाच एक ‘भिकारदास मारुती’.

आता याबद्दल मी जे म्हणते ते केवळ पुण्यातील एक मंदिर अशा अर्थाने नाही. तो भाग निराळा.

पुण्यातील नावामागचा इतिहास शोधला तर असं कळलं की कुणीतरी भिकारदास शेठनी ते मंदिर बांधल्याने हे नाव पडले.

परंतू, मारुतीला खऱ्या अर्थी भिकारदास देखील म्हणतात, हे माझ्या परिचयातील एका आजींनी मला सांगितले होते ते आजच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटते.

म्हणजे, जो सर्व शक्तिमान आहे, त्याला कुणी अंजनीसुत म्हणतं कुणी मारुती कुणी हनुमान कुणी हनुमंत. पण या सर्व नावाआधी जेव्हा त्याला भिकारदास म्हणतात तेव्हा केवळ अज्ञानामुळे मन दुखावते. 

परंतू त्या नावामागे फार मोठा अर्थ आहे.

तो असा की, ज्या वेळी हनुमान आणि प्रभू श्रीरामाची भेट झाली त्या वेळी राम राजा नव्हताच. चेहऱ्यावर ईश्वरी तेज असले तरी शरीर मात्र जंगलात फिरून, काट्याकुट्यात फिरून काहीसे थकलेले दिसत होते.

मुळातच राज्य हरलेला, वनवासाचे कपडे परिधान केलेला, सर्व काही हरलेला अगदी बायकोला ही गमावून बसलेला अखंड ब्रम्हांडातील दुःखं झेलणारा महाभिकारी झाला होता. अत्यंत दीनवाणी अवस्थेत सीतेला शोधत तो वणवण करत फिरत होता. 

आणि अशा, कितीही  महान व अवतारी पुरुष असलेल्या,  परंतू तत्कालीन भिकार अवस्थेतील केविलवाण्या रामाचे दास्य हनुमानाने स्वीकारले होते. 

राम-हनुमान

अगदी लंकेत जाऊन सीतेचा शोध, रामाला लंकेत जाण्यासाठी केलेली मदत, रामसेतू बांधतांना आणि संजीवनी आणताना केलेली त्याची धडपड ही अतिशय निरपेक्ष स्वामीनिष्ठा होती. 

राम सिंहासनावर फार नंतर बसला. पण तोवर हनुमानाने केलेली त्याची भक्ती ही कोणत्याही राजाच्या सेवकाची नव्हती. 

‘भिकारदास मारुती’ हे नाव अगदी तेव्हा पासून माझ्या मनांत फार घट्ट बसलं. 

दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना… म्हणतात ते किती खरे आहे नाही का?

जसं भक्तावाचून देव एकटा अगदी तसेच, हनुमानाशिवाय राम देखील एकटाच !

राम राज्यात हनुमानाला भेट म्हणून मोत्याचा हार मिळाला असता तो देखील तोडून त्याने प्रत्येक मोत्यात राम आहे का हेच प्रथम शोधले. 

माकडाला मोत्याचे मोल काय कळणार? अशी सीतेची भावना झाली असली तरी ‘ज्या गोष्टीत माझे प्रभू राम नाहीत ती माझ्यासाठी व्यर्थ आहे’ ही त्याच्या मनातील चिरंतन भावना त्याने सिद्ध केली तेही स्वतःच्या हृदयावरील त्वचेचे आवरण बाजूला करून. 

हनुमानाच्या हृदयामध्ये प्रभुरामाची मूर्ती साकारलेली पाहून  सीतेच्याही  डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले, आणि म्हणाली, “
धन्य आहे हनुमाना, तू आणि तुझी रामभक्ती.”

रामाच्या कोणत्याही मंदिरात, सीता आणि लक्ष्मणासोबत प्रेमाने नमन करणारी हनुमानाची मूर्ती देखील असतेच. 

त्या चिरंजीव हनुमंताचा आज जन्मोत्सव ! 

रामायणातील रामाच्या या महान भक्ताला, दासाला म्हणजेच भिकारदास मारुतीरायाला कोटीकोटी प्रणाम. 

II श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये IISource link