आज जागतिक महिला दिन. आणि त्यानिमित्ताने सकाळपासून अनेक शुभेच्छा मिळाल्या. खरंतर महिला म्हणून जन्माला येऊन मला वेगळा असा काय फायदा झाला? त्याचा विचार करत इतर महिलांना शुभेच्छा पाठवल्या. दिवस रोजचाच फक्त शुभेच्छा वेगळ्या.

२१ व्या शतकात आज देखील स्त्री – पुरुष समानता अस्तित्वात नाही आणि स्त्री ला दुय्यम वागणूक दिली जाते ह्याचे अनेक पुरावे आहेत. 

मागच्याच आठवड्यातील उदाहरण सांगते. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पकडलेल्या आरोपीला चक्क सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानेच प्रश्न केला की  “पिडीतेशी लग्न करायला तयार आहेस का तर तुझ्या याचिकेवर विचार करू.”

या एका प्रश्नाने अखंड न्यायव्यवस्थाच एक विनोद होऊन बसली, असं मला वाटतं.

भारतात ‘लग्न ’ म्हणजे सर्व समस्यांची समाप्ती, असं एक वेगळंच गणित आहे. पण लग्न दोघांचं असतं, आणि मुलीची देखील लग्नाला संमती घ्यायला काही हरकत नसते हे भान न्यायमूर्ती महाशयांना  नसावं. 

बरं. तो लग्नाला तयार झाला तरीही, एखाद्या बलात्कार करणाऱ्या माणसाशी लग्न म्हणजे त्या मुलीला आयुष्यभराची शिक्षा आहे हे अर्थातच त्यांना जाणवले नसावे, कारण ‘ती’चा कोण विचार करणार? 

ज्या माणसाने एका कोवळ्या मुलीवर बलात्कार केला त्या नीच माणसाची बाजू मांडण्यासाठी वकील आहे. विवाहित असल्याने तो दुसरा विवाह करू शकणार नाही. त्याला शिक्षा झाल्यास त्याची सरकारी नोकरी जाईल त्यामुळे त्याला या कायदेशीर बाबीत न अडकण्यासाठी चाललेली धडपड. या सगळ्यामध्ये, ‘तीचं’ अस्तित्व शून्य. 

निर्भया’ बलात्कार प्रकरणात ज्या नीच माणसाने विकृतपणे तिच्या शरीराचे हाल केले, त्या माणसाला ‘मानवतावादी’ लोकांचा पाठींबा मिळतो, आणि तो त्याच्या वयाच्या आकलनशक्ती विरुद्ध वागला म्हणजे त्याच्या मानसिक बाजूचा विचार करायला हवा असं म्हणणारी वकील मंडळी माझ्या तरी आकलनाच्या बाहेर आहेत. 

मानवतेच्या गप्पागोष्टी फक्त पुरुषांच्या बचावात्मक भूमिकेसाठी असतात. जिथे ‘तिच्या’च अस्तित्वाला कुणी जुमानत नाही तिथे मग,  त्या वेळी कोणतं राजकीय पक्ष होता, कोणाच्या सत्तेत ती घटना घडली हे सर्व गौण होतं. 

माझ्यावर, माझ्या बहिणीवर, माझ्या मैत्रिणीवर किंवा कुणाही निकटच्या मुलीवर हे संकट कोसळलं नाही यातच धन्यता मानून इतर पूर्ण समाज सुटकेचा निश्वास टाकून मोकळा होतो. पण प्रत्येक स्त्री मात्र, आतून हादरलेली असते. 

कुणाला फाडून टाकलं तर कुणाला जाळून टाकलं, याची खोलवर नोंद तिच्या मनात होते आणि एक पुसटशी भीती कायम तिच्या मनात घर करून राहते. 

त्याच भीतीने ती कायम दबून राहते. ही भीती असते  पुरुषाची. आयुष्यभर स्त्रीत्व जपून ठेवण्याची तारांबळ! कारण हा समाज केवळ पुरुषांचाच, त्याच्याच नियमाने चालणारा, त्यांचीच बाजू सांभाळणारा. 

अशा काही घटना बघितल्या की खरोखर जाणवतं, की एका बाजूला स्त्री अंतराळात पोचली असली तरी मोठ्या प्रमाणात अजूनही स्त्रीचा अस्तित्वाचा संघर्ष मोठा आहे.

आपला समाज अजूनही स्त्री ला पुरुषापेक्षा वरचढ बघू शकत नाही. सतत रडणारी, कर्तव्याच्या ओझ्याखाली दबलेली, तारांबळ उडालेली, घाबरलेली, दुसऱ्यावर विसंबलेली स्त्री काहींना आदर्श वाटते. तिच्या त्या दिवसांत देखील तिने कुठलीही तक्रार न करता घरात राबत राहावं अशी अपेक्षा असते.

आर्थिक परिस्थिती सबळ असलेल्या देखील अनेक स्त्रिया अजूनही स्वतः मात्र आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहीत. मग वर्षातून एकदा येणाऱ्या शुभेच्छा घेऊन एक दिवस हसत पुढे ढकलायचा या पलीकडे स्त्री कडे दुसरा पर्याय उरत नाही. 

त्यामुळे, आपला लढा आपल्यालाच लढायचा आहे हे विसरून चालणार नाही. अजून पुढील अनेक वर्ष ही असमानता असणार आहे. 

‘माझे आयुष्य माझी जवाबदारी ’ हे एकच मनावर बिंबवणे प्रत्येक स्त्रीच्या हातात उरले आहे. 

जागतिक महिला दिन हा आजच्या दिवसा अंती संपेल. पण स्त्रीचा संघर्ष सुरु राहणारच आहे.

असो. मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा !

 Source link